पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे मराठी भाषेतील स्रेष्ठ लेखक, नाटककार, संगीतकार, आणि वक्ता होऊन गेले. पुण्यात एका मराठी घरात जन्माला आल्यामुळे, आणि वाचन प्रिया असणारे पालक असल्यामुळे पुलंच्या सर्व कामाचा लहानपणापासून सहवास मला लाभला आहे. त्यामुळे मराठीतल्या काही सर्वोत्कृष्ठ कलाविष्कारांचा मला आस्वाद घेता आला. हा लेख काही पुलंच्या अफाट कारकिर्दीचा समावेश करण्याचा प्रयत्न नाही आहे. किंवा त्यांच्या कामाचं समीक्षण करण्याचा प्रयत्न तर मुळीच नाही आहे. तेवढा माझा अभ्यास नाही आणि माझी पात्रता देखील नाही. मात्र केवळ एक रसिक म्हणून त्यांच्या लेखनाचा, त्यांचा नाटकांचा, त्यांच्या संगीताचा, आणि त्यांच्या वक्तव्याचा माझ्यावर जो प्रभाव झाला, त्याचा आढावा घेण्याचा हा एक लहानसा प्रयत्न आहे.
मुख्यतः पुलंची गणती जरी विनोदी लेखकांमध्ये करावी लागत असेल तरी त्यांच्या लेखनातून सतत कारुण्याची एक झाक दिसत राहते. विशेषतः त्यांनी रेखाटलेल्या व्यक्तिचित्रात. सबंध समारंभ चालू असताना स्वतः उत्साहित असणाऱ्या, आणि लोकांच्या उत्साहाचा केंद्रबिंदू असणाऱ्या नारायणाचं कार्य संपल्यानंतरचं किंवा लहान मुलांना इतिहासाच्या गोष्टी सांगून त्यांचं सतत मनोरंजन आणि संबोधन करणाऱ्या हरितात्यांचं त्यांच्या आयुष्याच्या शेवटी एकटे पडल्यावरचं दोन-दोन ओळींचं वर्णन मनावर आघात करून जातं. रावसाहेबांची त्यांना कधीच न गवसणारी संगीत कलेला प्राप्त करण्याची, आणि हे आपल्यचाने होणार नाही हे लक्षात आल्यावर त्यावर उपाय म्हणून स्वतः भोवती कलावंतांची गर्दी जमवण्याची त्यांची धडपड पाहून त्यांचा संगीतप्रेमाची तीव्रता जाणवते. अंतू बर्वे, पेस्तनकाका, सखाराम गटणे आणि असे त्यांचे इतर अनेक वल्ली माझ्या मनात कायमचं घर करून बसले आहेत.
पोस्टमन आणि पोस्ट ऑफिस, किंवा साधी पानाची टपरी ह्यासारख्या रोजच्या आयुष्यात दिसणाऱ्या गोष्टीतही त्यांचं स्वतःचं एक प्रचंड विश्व असू शकतं हे पुलंनी दाखवून दिलं. सामान्य मध्यमवर्गीय माणसाचं जीवन, त्यातले आनंदाचे आणि दुःखाचे क्षण; परिवारातील जनरेशन-गॅप मुळे होणार विसंवाद, पण त्यावर मात करणारे एकमेकांबद्दलचे प्रेम; हे सारे विश्व त्यांचा असामी-असामीतल्या “मी” च्या डोळ्यातून आपण जगतो. असेच अनेक मी जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्यांचे अनेक सूर एकत्र मिसळतात, आणि कधी सुंदर संगीत निर्माण होतं, तर कधी नुसताच गदारोळ होतो. ही दोन्ही रूपं मला बटाट्याच्या चाळीत पुरेपूर पाहायला मिळाली. त्याच चाळीत किंवा चाळीबाहेर जरा डोकं काढल्यावर दिसणाऱ्या, आणि सतत आसपास असणाऱ्या पक्षांचे आणि प्राण्यांचे स्वभाव, आणि मानवी स्वभावांशी त्यांचं साधर्म्य पुलंनीच मला दाखवून दिलं.
ह्या अशा त्यांच्या अनेक कथा लहानपणी मला आणि माझ्या बहिणीला बाबांनी वाचून दाखवल्या होत्या, आणि पुलंच्या साहित्य विश्वाचा पहिला परिचय करून दिला होता. मोठं झाल्यावर दृश्य आणि श्राव्य माध्यमातल्या रेकॉर्डिंग मुळे खुद्द पुलंच्या आवाजात, त्यांच्या खास शैलीत हे त्यांनी घडवलेलं व्यक्तिरेखांचं विश्व अनुभवायला मिळालं.
संगीतकार पुलंनी “इथेच टाका तंबू”, “शब्दावाचून कळले सारे”, “ही कुणी छेडिली तार”, “माझे जीवन गाणे” आणि अशा इतर अनेक अप्रतिम चाली दिलेल्या आहेतच, पण “नाच रे मोरा” हे त्यांचे अजरामर बालगीत प्रत्येक लहान मुला-मुलीच्या ओठांवर कधी ना कधी येतेच. “वार्यावरची वरात” ही पुलंची संगीतिका तर त्यांच्या स्वतःच्या पेटी वादनाने सजली आहे.
नाटककार पुलंनी लिहिलेलं “तुझे आहे तूजापाशी” हे बहुतेक माझं सर्वात आवडतं मराठी नाटक आहे. सतत त्यागाची आणि संन्यासाची भाषा न बोलता संसारात राहून आणि जगातील सौंदर्याचा आस्वाद घेऊनही माणूस सुखी राहू शकतो, आणि केवळ व्यवहारिकच नाही तर मानसिकही समृद्ध जीवन जगू शकतो हा वेगळाच विचार त्यांनी त्या नाटकात मांडला आहे. स्वतःशी आतून खरे असणे हे सर्वात महत्वाचे आहे हा संदेश एका वेगळ्याच कथानकातून त्या नाटकात आपल्यासमोर येतो. त्याबरोबरच “ती फुलराणी” आणि “सुंदर मी होणार” हे “The Pygmalion” आणि “The Barretts of Wimpole Street” ह्या इंग्रजी नाटकांचे खरे भावानुवाद आहेत. केवळ भाषांतर न करता त्या नाटकांचा भाव मराठी संस्कृतीत, इथल्या परिस्थितीत मिसळून त्यांनी लिहिलेली ही नाटकं खरंच मराठी वाटतात. नाहीतर नुसतंच सरळ भाषांतर केलं तर त्यांच्याच “सदू आणि दादू” नाटकात त्यांनी विडंबन केल्याप्रमाणे “Sausages at Nicholas’ Restaurant” चं “निमकराच्या खानावळीतली डुकराच्या मासाची तळलेली भाजी” होतं.
ह्या पलीकडे देखील पुलंनी अनेक सिनेमांच्या पटकथा लिहिल्या, इंग्रजीतून मराठीत अनेक इतर साहित्याचे भावानुवाद केले, अनेक प्रवासवर्णने लिहिली, चरित्रे लिहिली. वक्ता म्हणून त्यांनी केलेली भाषणे देखील ऐकण्यासारखी आहेत. ह्या लेखाच्या सुरुवातीलाच म्हणालो होतो तसं हा काही त्यांचा संबंध कारकिर्दीचा आढावा घेण्याचा प्रयत्न नाही. त्यासाठी एक संपूर्ण पुस्तकाचं लिहावं लागेल. खरं म्हणजे अशी बरीच पुस्तक अभ्यासकांनी लिहिलेली असतीलच. हा फक्त माझा एक छोटा प्रयत्न होता, पुलंच्या कामाचा मला आलेला अनुभव सांगण्याचा.